श्री दत्त हृदयालय : श्री क्षेत्र नरसोबाची वाडी:
श्री दत्त हृदयालय : श्री क्षेत्र नरसोबाची वाडी:
शिवंजय डॉ संजय होनकळसे©
भारत भर तीर्थ अनेक ।
एक एकाच्या करवल्या 'त्याने 'वाऱ्या अनेक।।
वाडी व केदारनाथास जे शांती समाधान मिळे।
त्यांचे महात्म्य शब्दातीत ,विरळे।।
कालियुगौ चंडी ,दत्त ,विनायकौ।
कलियुगांत दत्त,चंडीव विनायक हि जागृत उपासना स्थाने आहेत.त्यात दत्तप्रभु हे स्मतृगामी आहेत म्हणजे जे स्मरण करतांच समोर उभे ठाकतात ते स्मतृगामी दत्त. सत्ययुगातील दत्तात्रेयांचे 16 अवतार आहेत .गिरनार हे दत्तात्रेयांचे मुख्यालय head office.कालियुगी तीन अवतार त्यातील प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती हे द्वितीय अवतार होत.तर तिसरा स्वामी समर्थ अवतार,काहीजण वासुदेवानंद सरस्वती यांनाही अवतार म्हणून मानतात नृसिंह सरस्वती स्वामी हा अवतार कर्नाटक महाराष्ट्रात जास्त वावर झालेला असा अवतार त्यांची तीन पादुकापीठे हि जागृत,पवित्र व शक्तीस्थाने मान्यता पावलेली आहेत.वाडीस मनोहर पादुका , औदुंबर येथे विमल पादुका तर गाणगापुरच्या निर्गुण पादुका, तिन्ही स्थाने हि नदी किनारी वसलीयेत,गाणगापूर हे भीमा अमरजा संगमावर बसलय तर औदुंबर व वाडी हे कृष्णा तीरी ,अर्थात वाडीसही संगम आहे.भारतीय धर्मशास्त्रात संगमास अत्याधिक महत्व आहे . हिमालयातील पांच गंगा संगम अत्यंत पवित्र व पावन मानली जातात .संगमास प्रयाग म्हणतात असे विष्णू प्रयाग ,कर्णप्रयाग,नंद प्रयाग ,रुद्रप्रयाग, व देवप्रयाग व अल्लाहाबादचे तीर्थराज प्रयाग,प्रयागराज.टूर operaters बरोबर जे जातात त्यांना या बाबी खचितच माहिती असंतात ,फारच थोडे येथे थांबतात ,थांबतात शब्द अशासाठी व वापरतोय कारण ही सर्व प्रयाग बद्रिकेदार मुख्य मार्गावरच आहेत ,आम्ही नेहमी स्वतःच यात्रा केल्याने व सतत अनेकवार करवून घेतल्याने वारंवार या संगमात स्नान तर्पण केले गेलय.असो संगमाच्या महत्व समजवण्या निमित्त हे विषयांतर.
तर ही तीनही दत्त स्थाने संगम व नदी किनारी आहेत.सारीच पवित्र आहेत त्यात सर्वात जवळच व आपलंसं ,हक्काचं व छान ,स्थान म्हणजे वाडी.कृष्णेचं बारमाही वाहणारं पात्र, काळ्या दगडातला घाट आणि घाटावर मध्यभागी औदुंबराखाली असलेलं दत्त मंदीर....
नृसिंह सरस्वती महाराज यांनी स्थापन केलेली दत्त महाराजांची पाऊलं मनोहर पादुका म्हणजे अखंड शक्तीचा स्रोत.....परमामानंदाचा झरा.कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेलं वाडीचं दत्त मंदिर म्हणजे जीवाला मनोहर शांती. इथे नृसिंह सरस्वतींनी बारा वर्ष वास्तव्याला होते, यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरुन त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांनाच मनोहर पादुका म्हणतात.
लहानपणापासूनच दत्त शिव भक्तीचं ओढ. पार हिमालय, गिरनार (५ वेळा)पासून कुरवपुर अनगीनत वेळा,कन्याकुमारीपर्यंत (अनगीनत)पर्यन्त जवळ जवळ सर्व दत्त स्थानेव केदाार खंड ते कन्याकुमारी पर्यंत,अरुणाचल पासून औदूंबर पर्यंत दत्त स्थानांच्या व इतर सर्व पवित्र स्थान व तीर्थांचा अनेकदा वाऱ्या झाल्या, सप्त नद्या ,सप्त पुऱ्या ,सप्त कैलास ,34 शक्ती पीठे ,30 पितृ स्थाने, 12 ज्योतिर्लिंगे 36 वेळा प्रत्येकी, पंच प्रयाग ,पंच केदार ,पंच बद्री,शंकाराचार्य चार धाम,बुद्ध चार धाम,अगदी प्रस्तुकुल परिस्थितीत व कुठच्याहि प्रकारची सामाजिक,मानसिक,आर्थिकपण,शारीरिक पात्रता नसतांना करवून घेतले गेल्या. पण गंगा नर्मदा ,केंदार व नरसोबाची वाडीची बातच काही और आहे न्यारी आहे .जी शांती सकून केदार नाथ हिमालय व वाडीस मिळते तीला तोड नाही.
गिरनार दत्त हेड ऑफिस मुख्यालय ।
तर वाडी हृदयालय
दत्त महाराज....नुसत्या नामस्मरणाने प्रसन्न होणारी देवता....एकाच हाकेला धावणारी माऊली....आमच्या दत्त परिवारांत अनेक मनोभावे ,निरामय निरपेक्ष सेवा देणारे व करवून घेणारे अनेक आहेत जसे आमचे नरेशभाऊ क्षिरसागर, गुरुबंधू बंडू कैलास कुलकर्णी, श्री दोड ,श्री हेमंत कर्वे ,श्रीमती ज्योती बोरस्कार, सुप्रिया माउली टिपरे,सतत दत्त सेवा यात्रा करतात करवीतात. वर्षाला सतत दत्त सेवा ,यज्ञयाग करतात.त्यांच्या अविरत सातत्यपूर्ण सेवेस त्रिवार वंदन.
वाडीचं वेड, आणि वाडीची ओढ, नेमकी कधी आणि कशी लागली माहिती नाही.पण 1986 डीसेंबरला प्रथम येणे घडले, त्यानंतर अनेक वर आलो अनेक उत्सव ,याग पवमानसेवा ,महारुद्र सेवा दिली गेली.आमचे जेष्ठ गुरुजी श्री अवधूतशास्त्रीचं पावन सांन्निध्य व पौरोहियाचा लाभ मिळाला.कधीही मनात आलं की मिळेल ती बस अथवा ट्रेन पकडून वाडीला पोहोचायचं, एक-दोन दिवस राहून परतीला लागायचं हे कायम ठरलेलं.
कृष्णामाई हि अत्यंत संथ,शांत वाहत असते तिला कधीही तुफान आलेलं निदान मलातरी माहीत नाही,एक दोनदा ती महाराजांचे चरण स्पर्श करण्यासाठी मंदिरा पर्यंत चढते एवढेंचं.मंदिरात ऐकू येणारे मंत्र श्रवण करीत कृष्णाकाठी तास न तास बसलं तरी कंटाळा येत नाही. शांत चित्ताने, मनात कोणताही विचार न आणता काठावर बसलं की अनेक न उलगडणार्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होते. मुंबईच्या गजबटापासून दूर शांत, पवित्र, प्रसन्न वाडीत मन रमतच.
वाडीला गेल्यावर सकाळची आरती, दुपारी बाराची महापूजा, दुपारी 3 ला होणारं पवमान सूक्त(दुपारी पवमान चालू असताना दत्त महाराजांची फेरी असते, अशी भाविकांमध्ये श्रद्धा असल्याने बरेच भाविक यावेळेत मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात) रात्रीची श्रींची पालखी....सगळं न चुकवण्यासारखं. नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे. याशिवाय टेम्भे स्वामी, नारायण स्वामी, काशीकरस्वामी, गोपालस्वामी, मौनीस्वामी इ. समाधी मंदिरं आहेत.
वाडीचं दत्तमंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे.त्यामुळे ते इस्लामी थाटाचे आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले होते.बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. पुजाऱ्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला, तिला दिसू लागले. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते.
नदी पलीकडे असणारी औरवाडचं अमरेश्वर आणि घेवड्याच्या शेंगांचे मंदिरही बघण्यासारखे आहे. अमरेश्वर मंदिरात आजही योगिनींचा वास असून त्या नियमित महाराजांच्या पूजेसाठी येतात, असे सांगितले जाते. अमरेश्वर मंदिरामागे असलेल्या गावात घेवड्याच्या शेंगांचे मंदिर आजही कुलकर्णी कुटुंब आनंदाने सांभाळत आहेत. गुरुचरित्रात अठराव्या अध्यायात घेवड्याच्या शेंगांच्या झाडाची कथा आहे. या व्यतिरिक्त जवळ असलेल्या शिरोळ गावी असलेलं भिक्षापात्र मंदिर, खिद्रापूरचं धोपेश्वरमंदीर पण सुंदर आहे. पण वाडीला येणाऱ्या बऱ्याच भक्तांना या चारही मंदिराबाबत काहीच माहिती नसते.
अशा या पवित्र पावन ठिकाणी या वर्षी अधिक मासात याग करावा हा विचार आम्ही दोघं तिघां नी केला व तो मी लगेचं उचलून धरला.आतापर्यंत केलेल्या यागांत मी व माझ्या विद्यार्थी मित्रांनीच सहभाग असे .
मग काय अधिकास्य अधिकं फलं या न्यायाने 2 व तीन जून ला दत्त याग दत्त मालामंत्र युक्त 11000 आवर्तने ,विष्णू याग ,व 'द' कारात्मक सहस्त्र दत्त नाम आवर्तन याग श्री वल्लभ शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली केला .
विशेष सेवा म्हणून आमच्या स्नेही सुविद्य श्रीमती स्मिता जयंत कुलकर्णी "परी"यांचे नर्मदा अनुभव कथन ठेवले.माझ्या विनंतीस मान देऊन त्या आपल्या सुपुत्राची ,रोहनची,तब्बेत बिघडली असतानाही सेवा भावाने आल्या. त्यांनी 2017 ,आक्टो ते 15 फेब 2018 ,315 दिवसांत "परी"क्रमा पार केली ती अत्यंत प्रतिकूल "परी"स्थितीत तीही शरणागत भावाने .त्यांनी त्यांना आलेले "परी"क्रमानुभव त्यांच्या "परी"ने तल्लींन लीन होऊन "परी"णाम कारक पणे सांगितले.जवळ जवळ 3 तास त्या "परी"कथन करीत राहिल्या.नर्मदा मय्या कशी पदोपदी व परो "परी"आपल्यासाठी उभी राहते व व्यवस्था करते ,वैराग्यभाव जागृत करते याच भाव"परी"पूर्ण विवरण त्यांनी केलं .आम्ही सारे व त्याही "परि"पूर्ण पुणेकर असूनही महाप्रसाद झाल्यावर लगेचच आपल्या अनुभव कथनावर अत्यंत हळवे पणे ओघवत्या पद्धतींनी आपल्या "परी"क्रमेचा चित्रमय flashback आमच्या हृदय पटलांवर कोरत्या झाल्या.त्यांचा मी, आम्ही ,ऋणी आहोत कारण त्या इतरांना "परी" क्रमा करण्याची उर्मी जागृत करू शकल्या.अध्यात्मिक दृष्टी आवाक्यात आल्यावर सांसारिक अडचणी सहज साध्य होतात व क्षुल्लक आहेत याची जाण यात्रे च्या माध्यमातून शिकता येते.त्यांच्या कडून अशीचं निरामय सेवा घडो.
वाडी आणि परिसरात अनेक दिव्य अनुभव आजही भक्तांना येतात. महाराजांच्या अस्तित्वाची खात्री महाराज देतच असतात. त्यांच्याकडे काही मागावं लागत नाही, मागण्या आधीच ते आपल्या पदरात आलेलं असतं.
चिंता कसया करतोस या घडीला
येई भेटाया नरसोबास वाडीला
दत्तच उभा राही तुजा अडीनडीला!
याची प्रचिती वाडीला गेल्यावर येतेच येते. खरंच वाडी हे या दृष्टीने दत्तास्थानातील हृदयालाय आहे. ब्रेनपेक्षा,मेंदूपेक्षा आपणास हृदय जास्त जवळचे,म्हणून वाडी हृदयस्थ.
शिवंजय डॉ संजय होनकळसे ©
desanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhoankalse.blogspot.com
अशा रीतीने आमची अधिक माससेवा श्री भटकती आत्मा जमदग्नीस्वरूप नाथ बाबा ,सोहोनी सर,व पोतदार माउलीं च्या साहाय्याने पुरुषोत्तमा चरणी पुनीत पावन झाली.
Comments
Post a Comment